Wednesday, 1 January 2020

       स्वागत नववर्षाचे
डायरीचं शेवटचं पान लिहिताना
उगीचच उदास वाटू लागलं,
लिहिता लिहिता मन मात्र
भूतकाळात घिरट्या घालू लागलं.....
          वर्ष संपले बघता बघता
          कळलेच नाही कसे ते,
          उरले काय आपल्या हाती
          हिशेब जुळवावे कशाचे....
दुःखाचे क्षण कित्येक आले
आनंदालाही उधाण इथेच आले,
पाठशिवणीचा खेळ तयांचा
अर्थ असे जणू आयुष्याचा.....
              सरत्या वर्षाच्या क्षितिजावरती
              झळाळतील किरणे नववर्षाची,
               घेऊनी मनी उमेद नवी
               चैतन्य प्रकाश पसरवेल रवी....
भासेल पुन्हा जग हे नवे
संकल्प नवे,नवी आव्हाने,
स्वागत करूया नववर्षाचे
प्राप्त व्हावे आम्हा लेणे चैतन्याचे.......
                      श्वेता पोळ-गिजरे

Friday, 6 December 2019

आम्ही दोघी.....त्या दोघी

आम्ही दोघी.....त्या दोघी
आम्ही दोघी तिशीतल्या,
त्या मात्र साठीतल्या...
अंतर वयाचं दुप्पट जरी,
मैत्री मात्र दोघीतली एकदम खरी....
              आम्ही दोघी बोलत होतो,
               बोलत होत्या त्याही दोघी...
                विषय वेगळेही असतील कदाचित,
                 आपुलकी मात्र एकच होती.....
हसत होत्या खळखळून अगदी,
ओसंडे जशी आनंदाची नदी...
क्वचित मिळणाऱ्या निवांत क्षणांना,
भरभरून जगत होत्या त्या दोघी....
            उरले नव्हते भान दोघींना,
             अवतीभोवतीच्या या जगाचे.....
              बोलत होता अनुभव डोळ्यातील,
              कुणीच नसते इथे कुणाचे......
त्या दोघींना न्याहाळणाऱ्या,
आम्ही दोघीही त्यांच्याच सारख्या...
समान आमच्यातील एकच धागा,
मैत्रीचा तो मने जोडणारा..…..
              एकमेकींच्या सहवासातील आनंद,
               मनमुराद जगत होत्या त्या दोघी.....
                प्रतिबिंब पाहुनी त्यांच्यात आमचे,
                भविष्यात डोकावणाऱ्या आम्ही दोघी....…
                                    श्वेता पोळ-गिजरे

Tuesday, 15 October 2019

रोजचे आयुष्य

रोजचे आयुष्य.....
रोजच सकाळी आम्ही लवकर उठतो,
घड्याळाशी स्पर्धा करत
त्यालाही कधी कधी मागे टाकतो...
धावपळ अशी रोजचीच झाली,
नवीन असं काहीच त्यात नाही.......
              अंक मोजा,शब्द लिहा,
               गणित सोडवा,पाठ वाचा,
               प्रश्नांची उत्तरे शोधा,
              कधी उत्तरांनाच प्रश्न विचारा...
              धांदल रोजचीच ही अभ्यासाची,
              नवीन असं काहीच त्यात नाही.......
माहिती भरा, कागद रंगवा,
ऑनलाईन राहत स्मार्ट व्हा...
ट्रेनिंग,मीटिंग तर असतेच नेहमी,
मधूनच लागते कधी शिबिराची वर्णी...
आला जी.आर,गेला जी.आर,
चर्चासुद्धा ही रोजचीच झाली,
नवीन असं काहीच त्यात नाही....
               रोजचेच असले सारे जरी,
               ऊर्जा मात्र असते रोजच नवी....
               अपेक्षेने आपल्याकडे पाहणारी,
               चिमुकली नजर भिरभिरणारी......
इवल्याशा त्या डोळ्यांमध्ये,
स्वप्ने उद्याची डोकावणारी....
या पंखांना बळ देण्या सज्ज नेहमी,
तुमच्यासारखी माणसे धडपडणारी.....
              म्हणून वाटते,
               रोज रोज जरी तेच असले,
               नवीन जरी त्यात काही नसले....
                नसण्यातील असण्याला शोधत जावे,
                रोजचेच आयुष्य रोजच नव्याने जगत जावे...........
                                   श्वेता पोळ-गिजरे
                     (समस्त शिक्षकांसाठी एका शिक्षिकेकडून)

Monday, 14 October 2019

नाव

नाव.....
        नावात काय आहे,असं आपण सारखं ऐकत आलोय.पण मला नाही तसं वाटत.नाव म्हणजे आपण असतो आणि आपल्यामुळेच आपलं नाव असतं. आता हेच बघा ना,आपल्या अमुक एका मैत्रिणीचं किंवा मित्राचं नाव घेताच ती व्यक्ती आपल्या नजरेसमोर उभी राहते,कारण की तिच्या नावाशी तिच्यातील सगळे स्वभावगुण आपण नकळत जोडलेले असतात.आपल्या जन्मापासून आपली सोबत आपलं नाव करत असतं,ते अगदी शेवटपर्यंत. स्त्रियांच्या बाबतीत हे विधान तितकंसं ग्राह्य धरता येणार नाही,तो भाग अलाहिदा.पण आपलं नाव म्हणजे आपली ओळख असते.ते उज्ज्वल करायचं की खराब करायचं,हेसुद्धा आपल्यावरच अवलंबून असते.
               प्रत्येकाला आपलं नाव असं प्रसिद्धीच्या झोतात असलेलं आवडतं, साधं आपल्याच नावाशी साधर्म्य असणारी एखादी मोठी व्यक्ती असली की आपलाही ऊर अभिमानाने(उगीचच) नक्कीच भरून येतो.ही सगळी आपल्या नावाचीच कमाल. आपलं नाव कुठेही लिहिलेलं आपल्याला नक्कीच आवडत नाही,कारण ते आपलं नाव असतं, आणि त्याला आपण स्वतः एवढंच जपत असतो,म्हणून मला वाटतं की,नावात खूप काही असतं... नाव म्हणजे आपल्या स्वभावाचं, गुणदोषांचं प्रतिबिंब असतं... हा एवढा सगळा शब्दप्रपंच कशासाठी...तर आज एका मैत्रिणीने मला माझ्या नावाची पाटी भेट दिली,तेव्हा वाटलं...कशाला उगीच,काय एवढं करायचं आपलं नाव वर्गात लावून...पण परत मनात एवढ्या सगळ्या विचारांनी गर्दी केली की नाव खरंच किती अविभाज्य भाग आहे आपल्या आयुष्याचा याची जाणीव झाली.आता या लेखाखाली मीही माझं नाव लिहिणारच आहे😊....
                                                        श्वेता पोळ

Saturday, 11 February 2017

आठवणीतली यात्रा


आज आईचा फोन आला,सांगत होती कि आज खंडोबाची यात्रा आहे म्हणून.......
खंडोबाची यात्रा ऐकल आणि मन लगेच भूतकाळात हरवून गेलं......
तिसरी किवा चौथी ला असेन मी तेव्हा,माघ पौर्णिमेला खंडोबाची यात्रा असते.हे खंडोबाच मंदिर आमच्या गावापासून जवळजवळ ५ किमी.असेल,पण डोंगरावर होत.एरवी कधीही लक्ष न देणारे आम्ही आजच्या दिवशी मात्र सकाळपासून तिकडे डोळे लावून बसायचो.यात्रेला जायची तर खूप इच्छा असायची,पण शाळा बुडवायची हिम्मत नव्हती बर आमच्यात.सकाळपासून आम्ही त्याच खंडोबाला मनोमन प्रार्थना करायचो,”देवा गुरुजींना आम्हाला सुट्टी द्यायला सांग बाबा”.....आणि अखेर आमची परीक्षा बघून बघून गुरुजी आम्हाला दुपारी सुट्टी द्यायचे.मग आमची गाडी खुश.यात्रेला कस जायचं,कुणासोबत जायचं,मैत्रिणीला कुठे भेटायचं अस सगळ प्लानिंग व्हायचं,आणि आम्ही निघायचो.यात्रेला जायचं,ते म्हणजे चालत चालत.....पण गप्पा मारत रस्ता कधी संपायचा कळायचा नाही.तिथे पोचलं कि फोन वगैरे काही नसताना वर्षा मात्र अगदी ठरल्याप्रमाणे भेटायची.आज ते आठवलं तरी विशेष वाटत.
       आमची खंडोबाची यात्रा म्हणजे एक विशेष गोष्ट आहे.डोंगरावर मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत.आणि या पायऱ्या म्हणजे जणू काही आमचं राळेगण आणि मांडवगण या गावामधली बोर्डर आहे.अलीकडे राळेगण आणि पलीकडे मांडवगण.ही यात्रा बारा गाड्यांची यात्रा म्हणून ओळखली जाते.दोन्ही बाजूला पायथ्याला दोन्ही गावातील कमीत कमी बारा बैलगाड्या जोडलेल्या असतात.या सगळ्या गाड्या,जो माणूस ठरलेला असतो ,त्याने ओढायच्या.दोन्ही गावातील ही दोन माणसे ठरलेली असतात,त्यांना देव म्हणतात.हे दोघेही अंघोळ करून येतात आणि गाड्या ओढायला सुरुवात करतात.वाजतगाजत हा कार्यक्रम चालतो.लोकांचा जल्लोष बघून ती जणू काही स्पर्धा वाटते.ठराविक उंचीपर्यंत आल्यावर मग गाड्यापासून देवांना सोडवतात आणि परत मंदिरात नेतात.तोपर्यंत पौर्णिमेचा चंद्र क्षितिजावर येऊन ठेपलेला असतो.मग सुरु होते लोकांची घाई,घरी जाण्यासाठी.लोक निघतात,ते राळेगणच्या गाड्या पुढे आल्या कि मांडवगण च्या या विषयावर चर्चा करत......


                                  श्वेता