Monday, 20 January 2025
Wednesday, 2 June 2021
चार थेंब पावसाचे...
चार थेंब पावसाचे....
चार थेंब पावसाचे
मातीवर कोसळले,
तापलेले गात्र तिचे
गारव्याने शहारले.....
चार थेंब पावसाचे
रानी वनी बरसले,
मुक्या वेड्या पाडसांना
जणू त्यांनी गोंजारले....
चार थेंब पावसाचे
तरु वेलींना बिलगले,
कारंजे मग हर्षाचे
पानोपानी अवतरले.....
चार थेंब पावसाचे
अंगणी माझ्या पडले,
मोत्याचे दालन जणू
माझ्यासाठी उघडले.....
थेंबांनी या पावसाच्या
कणाकणाला व्यापिले,
सृष्टीच्या गोड रुपाला
साजिरे तीट लाविले......
श्वेता
Monday, 19 October 2020
लॉकडाऊन
*लॉकडाऊन च्या काळात*....
लॉकडाऊन हे आलं,
सारं जग बदललं...
वेळेचही ते घड्याळ,
हळू सरकू लागलं...
सारी घरात बसली,
शंका एकच मनात...
काय करावे कळेना,
लॉकडाऊन काळात....
सुरुवात मग झाली,
घरी कामे सुरू झाली....
कोण गाणी गाती छान,
कुणी पेटीवर तान...
कुणी रमले बागेत,
कुणी चित्रात दंगले...
सारे विरलेले छंद,
वास्तवात उमटले....
सुट्टी साऱ्यांची ही खास,
चालू आहे आनंदात...
भान कशाला कुणास,
कोण राबते घरात....
तिला नाही कधी सुट्टी,
चोवीसच तास ड्युटी....
लॉकडाऊन असो काही,
कामे रोज ठरलेली....
थोडा वेळ तिला हवा,
तिचं मन रमवाया...
थोडे तिच्यासाठी जागा,
वर्क फॉर होम करा...
सुखाने नाही मिळाली,
जरी सुट्टी कामातून....
सुखासाठी घालवूया,
वेळ घरात राहून.......
*श्वेता पोळ गिजरे*
Wednesday, 15 April 2020
मी अनुभवलेला वासोटा
खूप दिवसांपासून इच्छा होती ,जंगल जवळून बघण्याची,जंगलातून फिरण्याची.आणि अचानक एक दिवस ही संधी आयतीच मिळाली.सांगलीच्या सह्यगिरी ट्रेकर्स समूहाने एक ट्रेकिंग खास महिलांसाठी आयोजित केले होते. मी तयारच होते, सोबतच अजून 2 मैत्रिणींना तयार केले आणि आम्ही वाट पाहू लागलो त्या दिवसाची.रविवारचा दिवस उजाडला.आदल्या दिवशी पावसाने गारासकट येऊन थैमान घातले होते त्यामुळे महापारेषण पहाटेपासूनच रुसून बसलेले होते.मग काळोखातच जे सापडेल ते बॅगेत अक्षरशः कोंबलं आणि बस गाठायला स्टँडवर पळालो...
गाड्या सांगलीहून येणार होत्या,त्यामुळे आम्ही उंब्रज पर्यंत एसटी ने गेलो.थोड्याच वेळात आमची गाडी आली आणि आम्ही गाडीत शिरलो.गाडीत गेल्यावर आमच्या असं लक्षात आलं,की आपल्या वयाचं तर कुणीच नाही या गाडीत,आता आपल्याला नक्कीच कंटाळा येणार,बायकांच्या टिपिकल गप्पा वगैरे ऐकाव्या लागणार.पण थोड्याच वेळात असं लक्षात आलं की सगळ्या जणी एवढ्या उत्साही होत्या की त्यातल्या एक मॅडम आम्हाला म्हणाल्या,"पोरींनो, आजचा दिवस आम्ही तुमच्या वयाच्या होणार बरं का!"आम्ही म्हणालो,"ये हुई ना बात".आता आपला प्रवास मस्तच होणार.गप्पा मारता मारता बामणोली आलं.थोडा वेळ विश्रांती घेवून,नाश्ता करून झाला. आता कधी एकदाचे लाँच मध्ये बसतोय असं झालं होतं.
11 वाजता आमचा लाँच चा प्रवास सुरु झाला.आपण रोज बघतो ती कोयना आपल्या पोटात इतकं पाणी सामावून ठेवते,याचा तर आम्हाला विश्वासच बसत नव्हता.अथांग असा हा शिवसागर जलाशय.त्यातून अगदी तोऱ्यात पाणी कापत आमची लाँच निघाली.थोड्या वेळाने एका बाजूला 4-5घरे दिसायला लागली.लाँच चालवणाऱ्या काकांना विचारलं तर त्यांनी सांगितलं, की त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे,पण त्यांचे अजून काही प्रश्न आहेत शासनदरबारी, ते सोडवल्याशिवाय जाणार नाहीत ते.बाप रे! कसे राहत असतील हे लोक?जिकडे पाहावे तिकडे पाणी,साधी वीज ही नाही इथे,संपर्काची साधने तर सोडूनच द्या.ज्या ज्या गावांनी आपल्या जमिनी या धरणासाठी दिल्यात,त्यांचा खरंच अभिमानच वाटला आम्हाला.आपलं घर,गाव,शेती सोडून जाणं, इतकं सोपं नाहीये.... त्यांनी आपली जनावरेही इथेच सोडली होती,बऱ्याच ठिकाणी म्हशी,बैल दिसत होते.असा दीड तासांचा प्रवास झाल्यानन्तर वासोट्याचा डोंगर दिसायला लागला.लाँच किनाऱ्याला लागली आणि आमची खऱ्या अर्थाने चढाई सुरू झाली....
जलाशयाचं पाणी आता कमी व्हायला लागलंय, त्यामुळे जुन्या गावांचे थोडेसे अवशेष रस्त्याच्या बाजूला दिसत होते.थोडं अंतर चालून गेल्यावर मोठं असं मैदान दिसलं,त्या मैदानातून चालत गेलो की अभयारण्याची कमान दिसली.कोयना अभयारण्याचं क्षेत्र तसं खूप मोठं आहे.कमानीतून आत गेल्यानंतर वनविभागाचा चेक नाका आहे,इथे आपल्या बॅग तपासतात,त्यात काही आक्षेपार्ह गोष्ट आढळली,तर लगेच जप्त करतात.आणि हो,आपल्याला आधी वनविभागाचा परवाना घ्यावा लागतो,त्याशिवाय आपल्याला आत प्रवेश नाही.सगळी औपचारिकता झाल्यावर,चालायला सुरुवात झाली.रस्त्याच्या बाजूला हेळा, कोकम,ऐन,जांभूळ अशी झाडे तर अळू,करवंद यांची झुडुपं दिसत होती.1 किलोमीटर अंतर चालून गेल्यावर एक मोठा ओढा आहे आणि ओढ्याच्या काठावर मारुती च मंदिर आहे.तिथुन किल्ला 3 किलोमीटर आहे.पण चढण असल्यामुळे आपल्याला हे अंतर लवकर संपत नाही.जसं आपण पुढे जातो तसं हे जंगल अजून घनदाट व्हायला लागतं. चोहोबाजूंनी दिसणारे उंचच उंच वृक्ष,त्या वृक्षांना लपेटून वरती जाणाऱ्या आणि क्षणभर सापाचा आभास करून देणाऱ्या वेली, मधेच किलबिल करणारे पक्षी,पायाखाली येणाऱ्या पाचोळ्याचा खस खस असा आवाज आणि एखादा वन्य प्राणी समोर येतोय की काय ही मनातली भीती,एकंदर वातावरण गंभीर बनत चाललं होतं.चालून चालून धाप लागल्यामुळे गप्पांचा ओघ आता मंदावला होता,प्रत्येकजण वर वर बघत हळू हळू एकेक पाय पुढे टाकत होता.पण काही केल्या डोंगर दिसायचं नाव घेईना.2 किलोमीटर अंतर संपून गेलं असेल,आता जंगल कमी झालं आणि पुन्हा ऊन चटकायला लागलं.इथे थोडी अवघड वाट होती.चालून चालून खडे खाली घसरले होते,त्यामुळे त्यावर पाय ठेवला की ते परत घसरायचे,मग शेजारी असलेल्या दगडाला,फांद्याला धरून कसेबसे वर वर चढत गेलो.
अशीच एक चढण चढून आम्ही वर आलो,सगळीकडून घामाच्या धारा वाहत होत्या,आणि तेवढ्यात मागे लक्ष गेलं.आमच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला....अप्रतिम...अहाहा..काय दृश्य होतं ते.तीनही बाजूनी वेढलेले डोंगर,त्या डोंगरावर ढगांनी धरलेली सावली,आणि मधेच दिसणारा शिवसागर जलाशय....जवळजवळ 6000 फुटावरून आम्ही हे दृश्य बघत होतो...अगदी डोळ्याचे पारणे फिटले....पुढे वळून पुनः चढायला सुरुवात केली आणि 15 मिनिटांत आम्हाला किल्ल्याचा बुरुज दिसायला लागला...बुरुज दिसल्यावर आपोआपच पायांची गती वाढली,शिवकालीन आठवणी पाहण्यासाठी आता सगळं शरीर उत्सुक झालं होतं...अगदी पायथ्याला गेल्यावर दगडी पायऱ्या आहेत,त्या चढून आम्ही किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला.तब्बल दोन ते अडीच तासांच्या चढाईनंतर किल्ल्यावर आम्ही पाऊल ठेवलं.किल्ल्यावर सुध्दा एक प्राचीन मारुती मंदिर आहे.त्याच्या मागच्याच बाजूला पाण्याची टाकी आहे,एका भिंतीमुळे ती दोन भागात विभागली आहे.त्या टाकीत भर उन्हाळ्यात पिण्यायोग्य भरपूर पाणी आहे.तिथूनच मागच्या बाजूला एक कडा आहे,तिथून आपल्याला सह्यादीची भव्यता दाखवून देणारा एक भलामोठा कडा आहे.आणि समोरच नागेश्वर सुळका आहे...मंदिराच्या डाव्या बाजूला शिवरायांच्या काळात जिथे कैद्यांना ठेवले जायचे ती जागा आहे.आता आपल्याला तिथे फक्त एक चौथरा दिसतो.गड पाहिल्यानंतर आपल्याला एक गोष्ट नक्कीच जाणवते ती म्हणजे शिवाजी महाराज गडबांधणी आणि गडाचं व्यवस्थापन किती अचूक करायचे,त्यांची भविष्याकडे पाहण्याची दृष्टी सुद्धा अपूर्व होती.त्यांना कितीही मुजरे केले तरी थोडेच आहेत.त्यांच्या चरणी पुनः पुनः नतमस्तक व्हावे वाटते ते यामुळेच.आता चालून आलेला थकवा कुठल्याकुठे नाहीसा झाला होता.छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडावरून एक वेगळीच ऊर्जा मनात साठवून सगळे पुनः आता गडउतार व्हायला लागले..सूर्य सुद्धा दिवसभराच्या धावपळीने थकून मावळतीकडे झुकू लागला आणि सगळ्या लाँच शिवसागर जलाशयातून वेगाने मार्ग आक्रमत किनाऱ्याकडे झेपावू लागल्या........
*सह्याद्री आणि कोयनेच्या जाज्वल्य अभिमानातून*........
✒️श्वेता पोळ-गिजरे
Monday, 23 March 2020
कधीतरी वाटतं, खूप काही लिहावं,
मनातल्या भावनांच्या वादळाला
शब्दांच्या मंडलात गुंफावं....
अशा वेळी मग शब्दच पाठ फिरवतात,
एकमेकांत अडकून अर्थहीन होऊन बसतात.....
शब्दांचा हा गुंता सोडवता सुटत नाही,
भावनेचे शब्द,की शब्दातील भावना,
हा पेच मात्र काही केल्या उलगडत नाही.....
मन नावाच्या अदृश्य बाटलीत,
अनेक भावनांची अव्यक्त रसायने मिसळलेली...
बाहेर पडण्यासाठी सदैव,
सर्वांचीच धडपड चाललेली.....
मनातली ही सारी वादळे अशी,
सारखीच मग घोंगावत राहतात....
भावनांची केविलवाणी ही जहाजे मग,
शब्दांच्या शिडाविना पुढे सरकू पाहतात....
सापडते जेव्हा शब्दांची वाट,
या घोंगवणाऱ्या तुफानाला...
बेफाम होऊन धावत राहते मग,
कोण आवरेल त्या आवेगाला....
सागरातून या भावनेच्या,
उठतात जेव्हा प्रचंड शब्दलाटा,
झेलण्यासाठी त्या हर लाटेला,
आश्वासक असा किनारा असतो हवासा.....
श्वेता पोळ गिजरे
Wednesday, 1 January 2020
डायरीचं शेवटचं पान लिहिताना
उगीचच उदास वाटू लागलं,
लिहिता लिहिता मन मात्र
भूतकाळात घिरट्या घालू लागलं.....
वर्ष संपले बघता बघता
कळलेच नाही कसे ते,
उरले काय आपल्या हाती
हिशेब जुळवावे कशाचे....
दुःखाचे क्षण कित्येक आले
आनंदालाही उधाण इथेच आले,
पाठशिवणीचा खेळ तयांचा
अर्थ असे जणू आयुष्याचा.....
सरत्या वर्षाच्या क्षितिजावरती
झळाळतील किरणे नववर्षाची,
घेऊनी मनी उमेद नवी
चैतन्य प्रकाश पसरवेल रवी....
भासेल पुन्हा जग हे नवे
संकल्प नवे,नवी आव्हाने,
स्वागत करूया नववर्षाचे
प्राप्त व्हावे आम्हा लेणे चैतन्याचे.......
श्वेता पोळ-गिजरे
Friday, 6 December 2019
आम्ही दोघी.....त्या दोघी
आम्ही दोघी तिशीतल्या,
त्या मात्र साठीतल्या...
अंतर वयाचं दुप्पट जरी,
मैत्री मात्र दोघीतली एकदम खरी....
आम्ही दोघी बोलत होतो,
बोलत होत्या त्याही दोघी...
विषय वेगळेही असतील कदाचित,
आपुलकी मात्र एकच होती.....
हसत होत्या खळखळून अगदी,
ओसंडे जशी आनंदाची नदी...
क्वचित मिळणाऱ्या निवांत क्षणांना,
भरभरून जगत होत्या त्या दोघी....
उरले नव्हते भान दोघींना,
अवतीभोवतीच्या या जगाचे.....
बोलत होता अनुभव डोळ्यातील,
कुणीच नसते इथे कुणाचे......
त्या दोघींना न्याहाळणाऱ्या,
आम्ही दोघीही त्यांच्याच सारख्या...
समान आमच्यातील एकच धागा,
मैत्रीचा तो मने जोडणारा..…..
एकमेकींच्या सहवासातील आनंद,
मनमुराद जगत होत्या त्या दोघी.....
प्रतिबिंब पाहुनी त्यांच्यात आमचे,
भविष्यात डोकावणाऱ्या आम्ही दोघी....…
श्वेता पोळ-गिजरे
Tuesday, 15 October 2019
रोजचे आयुष्य
रोजच सकाळी आम्ही लवकर उठतो,
घड्याळाशी स्पर्धा करत
त्यालाही कधी कधी मागे टाकतो...
धावपळ अशी रोजचीच झाली,
नवीन असं काहीच त्यात नाही.......
अंक मोजा,शब्द लिहा,
गणित सोडवा,पाठ वाचा,
प्रश्नांची उत्तरे शोधा,
कधी उत्तरांनाच प्रश्न विचारा...
धांदल रोजचीच ही अभ्यासाची,
नवीन असं काहीच त्यात नाही.......
माहिती भरा, कागद रंगवा,
ऑनलाईन राहत स्मार्ट व्हा...
ट्रेनिंग,मीटिंग तर असतेच नेहमी,
मधूनच लागते कधी शिबिराची वर्णी...
आला जी.आर,गेला जी.आर,
चर्चासुद्धा ही रोजचीच झाली,
नवीन असं काहीच त्यात नाही....
रोजचेच असले सारे जरी,
ऊर्जा मात्र असते रोजच नवी....
अपेक्षेने आपल्याकडे पाहणारी,
चिमुकली नजर भिरभिरणारी......
इवल्याशा त्या डोळ्यांमध्ये,
स्वप्ने उद्याची डोकावणारी....
या पंखांना बळ देण्या सज्ज नेहमी,
तुमच्यासारखी माणसे धडपडणारी.....
म्हणून वाटते,
रोज रोज जरी तेच असले,
नवीन जरी त्यात काही नसले....
नसण्यातील असण्याला शोधत जावे,
रोजचेच आयुष्य रोजच नव्याने जगत जावे...........
श्वेता पोळ-गिजरे
(समस्त शिक्षकांसाठी एका शिक्षिकेकडून)
Monday, 14 October 2019
नाव
नावात काय आहे,असं आपण सारखं ऐकत आलोय.पण मला नाही तसं वाटत.नाव म्हणजे आपण असतो आणि आपल्यामुळेच आपलं नाव असतं. आता हेच बघा ना,आपल्या अमुक एका मैत्रिणीचं किंवा मित्राचं नाव घेताच ती व्यक्ती आपल्या नजरेसमोर उभी राहते,कारण की तिच्या नावाशी तिच्यातील सगळे स्वभावगुण आपण नकळत जोडलेले असतात.आपल्या जन्मापासून आपली सोबत आपलं नाव करत असतं,ते अगदी शेवटपर्यंत. स्त्रियांच्या बाबतीत हे विधान तितकंसं ग्राह्य धरता येणार नाही,तो भाग अलाहिदा.पण आपलं नाव म्हणजे आपली ओळख असते.ते उज्ज्वल करायचं की खराब करायचं,हेसुद्धा आपल्यावरच अवलंबून असते.
प्रत्येकाला आपलं नाव असं प्रसिद्धीच्या झोतात असलेलं आवडतं, साधं आपल्याच नावाशी साधर्म्य असणारी एखादी मोठी व्यक्ती असली की आपलाही ऊर अभिमानाने(उगीचच) नक्कीच भरून येतो.ही सगळी आपल्या नावाचीच कमाल. आपलं नाव कुठेही लिहिलेलं आपल्याला नक्कीच आवडत नाही,कारण ते आपलं नाव असतं, आणि त्याला आपण स्वतः एवढंच जपत असतो,म्हणून मला वाटतं की,नावात खूप काही असतं... नाव म्हणजे आपल्या स्वभावाचं, गुणदोषांचं प्रतिबिंब असतं... हा एवढा सगळा शब्दप्रपंच कशासाठी...तर आज एका मैत्रिणीने मला माझ्या नावाची पाटी भेट दिली,तेव्हा वाटलं...कशाला उगीच,काय एवढं करायचं आपलं नाव वर्गात लावून...पण परत मनात एवढ्या सगळ्या विचारांनी गर्दी केली की नाव खरंच किती अविभाज्य भाग आहे आपल्या आयुष्याचा याची जाणीव झाली.आता या लेखाखाली मीही माझं नाव लिहिणारच आहे😊....
श्वेता पोळ









